भिवंडी (प्रतिनिधी )भिवंडी शहरातील फंडोले नगर परिसरात पहाटेच्या सुमारास धोकादायक झालेला यंत्रमाग कारखाना कोसळल्याने झालेल्या भिषण दुर्घटनेत तीन कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे. या मध्ये एका कामगाराची तब्येत गंभीर असल्याने त्यास मुंबई येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते. भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याचे हद्दीतील फंडोले नगर परिसरातील रेहमान कंपाऊंड येथे धोकादायक ठरवण्यात आलेले 2450 नागाव 1 येथे शब्बु शेख यांच्या मालकीचे दोन यंत्रमाग कारखाने आहेत.

आज सोमवारी पहाटे च्या सुमारास या यंत्रमाग कारखान्याचे लोखंडी अँगलसह पत्रा आणि चारी बाजूच्या भिंती अचानकपणे कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली आहे.या कारखान्या मध्ये आठ मजूर काम करत होते.रमजान महिना असल्याने पहाटेच्या वेळी पाच मजूर चहा पान नाश्त्या साठी कारखान्याच्या बाहेर गेले होते.त्यामुळे ते बचावले या दुर्घटनेत कारखान्या मध्ये काम करणारे आर्वेद, समशाह आलम,मोहम्मद कलाम खान असे तीन कामगार कोसळलेल्या ढिगाराखाली गाढले गेले होते.घटनेची माहिती महापालिकेच्या भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन मजुरांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले.

त्यांना उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलिस,पालिका आपत्कालीन विभाग घटनास्थळी दाखल झाले होते. सदर मालमत्ता धोकादायक असल्याने 18 एप्रिल 2023 मध्ये पालिका प्रशासनाने मालमत्तेचे स्ट्रक्चरल अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते अशी माहिती प्रभाग समिती क्रमांक 2 चे सहाय्यक आयुक्त सुधीर गुरव यांनी दिली आहे.तर महापालिका प्रशासनाने धोकादायक बाबतीत कोणत्याही प्रकारची नोटीस बजावली नसल्याची माहिती यंत्रमाग चालकांनी दिली.