भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे.दरम्यान आज शुक्रवारी सकाळी सुरेश म्हात्रे यांनी पुणे येथे जाऊन पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादी पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांची सदिच्छा भेट घेऊन निवडणूक संदर्भात चर्चा केली. भिवंडी लोकसभा मतदार संघात भाजपचे खासदार कपिल पाटील यांना या आधीच भाजप पक्षाचेवतीने उमेदवारी जाहीर झाली आहे.

मात्र महाविकास आघाडी कडून भिवंडी लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून रस्सीखेच सुरू होती.अखेर गुरुवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे भिवंडी लोकसभेसाठी सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सुरेश म्हात्रे यांनी याआधी २००९ मध्ये शिवसेने मधून भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवली होती.तर २०१४ मध्ये मनसे तर्फे भिवंडी लोकसभेची निवडणूक लढली होती,ज्यात कपिल पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता.२०१९ मध्ये शिवसेना पक्षात असतांनाही महायुती व भाजपचे उमेदवार असलेले खासदार कपिल पाटील यांना म्हात्रे यांनी जाहीर विरोध केला होता. तेव्हापासून सुरेश म्हात्रे व कपिल पाटील यांच्यातील राजकीय वाद समोर आला आहे.आता केंद्रीय पंचायती राज्यमंत्री असलेल्या कपिल पाटील यांच्यासमोर सुरेश म्हात्रे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच भिवंडीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, ढोलताशा वाजवत व एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला आहे. महाविकास आघाडीच्या सर्व पक्षीय नेत्यांबरोबरच शरदचंद्र पवारांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता भाजपच्या उमेदवाराचा निश्चितच पराभव करून भिवंडी लोकसभा मतदार संघातील प्रश्न सोडवून जनतेची सेवा करू अशी प्रतिक्रिया सुरेश म्हात्रे यांनी पत्रकारांना दिली आहे.