भिवंडी ( प्रतिनिधी ) लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भिवडी लोकसभा मतदार संघा अंतर्गत भिवंडी पूर्व,भिवंडी पश्चिम व कल्याण (पश्चिम) विधानसभा मतदार संघातील अधिकारी कर्मचाऱ्यां करीता प्रथम पायाभूत प्रशिक्षण व ईव्हीएम यंत्र हाताळणी प्रशिक्षण शनिवारी व रविवारी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव, उपजिल्हाधिकारी नंदकुमार कोष्टी, सहाय्यक निवडणूक उदय किसवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर ओसवाल महाविद्यालय सभागृह व तपोवन विद्यालय सभागृह याठिकाणी संपन्न झाले.

सुमारे 1128 उपस्थित कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणाची माहिती व मार्गदर्शन घेतले. मतदान केंद्राध्यक्ष, मतदानअधिकारी, शिक्षक व शिपाई यांचे करीता शनिवार व रविवारी मतदान प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.प्रसंगी भिवंडी लोकसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमित सानप,अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी अजय घुळवे,तहसीलदार अभिजित खोले अभय गायकवाड, रोहित कुमार राजपूत, नायब तहसीलदार मदन शेलार ,चंद्रकांत रजपूत अदि अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सर्व केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार प्रशिक्षणात निवडणूकीच्या कर्तव्यावर नेमणूक करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या प्रथम प्रशिक्षणासाठी ई व्ही एम मशीन तयार करण्यात आल्या.प्रथम प्रशिक्षणाच्या दिवशी ई व्ही एम प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यासाठी कक्ष तयार करण्यात आलेले होते.त्या ठिकाणी मतदान कक्षावर नियुक्त करण्यात आलेल्या क्षेत्रिय अधिकारी यांच्यामार्फत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी EVM मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.