भिवंडी मनपाच्या प्रभाग रचनेचे कामकाजाला सुरवात.
भिवंडी ( शरद भसाळे )
विधानसभा निवडणुकी नंतर प्रतीक्षेत असलेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या हालचालीला राज्याच्या प्रशासकीय पातळीवरून सुरुवात झाली असून “ड ” वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्या बाबतचे आदेश-२०२५ भिवंडी महानगरपालिकेस आज(११जुलै) रोजी मिळाले आहेत. त्यानुसार पालिकेच्या निवडणुक कार्यालयात कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु झाली असून शासन निर्देशानुसार भिवंडी महानगर पालिकेच्या नवीन 45 प्रभाग रचनेकडे राजकीय पक्षांचे पुढारी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
भिवंडी महानगर पालिका ही “ड ” वर्ग महानगरपालिका असून सन २०११ साली केलेल्या शहराच्या जनगणने नुसार मनपा क्षेत्राच्या हद्दीतील
नागरिकांची लोकसंख्या सुमारे ७ लाख ९ हजारापेक्षा जास्त आहे.मात्र गेल्या १४ वर्षात शहरात झालेल्या विकासानुसार येथील लोकसंख्या वाढली आहे.त्यानुसार नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून त्यांना अपेक्षित मूलभूत सुविधा मिळत नाही.तर स्थानिक काही लोकप्रतिनिधींनी गेल्या १० वर्षात शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करून घेतला.मात्र महानगर पालिका “क” वर्गा मध्ये नेऊ शकले नाही. तर काही लोकप्रतिनिधी ही नगरपालिका ” ड ” मध्ये राहावी याच मानसिकमध्ये राहून शहराची स्थिती जैसे थे ठेवण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येते. या पूर्वी राज्य शासनाने २०२२ मध्ये निवडणूक घेण्याचे ठरविले होते. त्यासाठी राज्य शासनाने
दिलेल्या आदेशानुसार ३ वार्ड सदस्यांचा एक प्रभाग बनविला होता. त्यानुसार अंतिम यादी देखील तयार करून शासनाकडे
पाठविली होती.मात्र कोर्टाच्या आदेशानुसार ही निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने ६ मे २०२५ रोजी कोर्टाने दिलेल्या निर्णया नुसार शासनाने महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेस
सुरुवात केली आहे.
त्यानुसार त्यांनी भिवंडी महानगर पालिका प्रशासनास प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार नुसार प्रत्येक प्रभागात ४ सदस्य राहणार आहेत. सर्वच प्रभाग चार सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग ३ अथवा ५ सदस्यांचा होतील.
अथवा दोन प्रभाग ३ सदस्यांचे होतील. तसेच भौगोलिक सलगता राखण्याच्या दृष्टीने प्रभाग रचना करताना नागरिकांची गैरसोय टाळता येईल अशा ठिकाणी असावेत,
असे नमूद केले आहे.
तसेच शासनाने दिलेल्या आदेशानुसार प्रभागाची सरासरी लोकसंख्या,
सदस्य संख्या,प्रभागाची संख्या, प्रभाग रचनेसाठी मार्गदर्शक तत्वे,
प्रभागाच्या सीमारेषा,
प्रभागाचे गुगल मॅप प्रमाणे नकाशे आदी बाबत प्रारूप रचनेसाठी सुचना व निर्देश दिले आहेत.सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर राजकीय पक्षांच्या कार्यालयात निवडणूक निमित्ताने हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्याने गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्ते आणि पुढारी केवळ भेटीगाठी आणि चर्चेवर भर देत होते. मागील निवडणुकीत भिवंडी महानगर पालिकेचे एकूण ९० नगरसेवक निवडून आले होते. त्यामध्ये ४५ पुरुष व ४५ महिला नगरसेविका यांचा समावेश होता. त्यावेळी एकूण ४ वार्ड सदस्यांचा एक प्रभाग होता. त्यामुळे २१ प्रभाग ४ सदस्यांचे आणि २ प्रभाग ३ सदस्यांचे होते. आता प्रभाग रचना नव्याने होणार असल्याने सत्तेचे गणित मांडणाऱ्या अपक्ष नगरसेवकांच्या
आणि राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांच्या हालचाली
सुरु झाल्या आहेत.
शहरातील समस्या “आ” वासून बसल्या असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या उमेदवारांना या निवडणुकीत चांगलाच फटका बसणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.
…………..
सध्या प्राथमिक स्थितीत जनगणनेनुसार शासनाकडून प्रभाग रचना करण्याचे आदेश आले आहेत. निवडणूक निमित्ताने एकूण कार्यक्रमाचा तारखेनुसार प्रारूप व अंतिम यादी व प्रभाग जाहीर करण्याचा आराखडा शासना कडून आलेला नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे शासनाचे आदेश उपलब्ध होतात त्यानुसार कामाची सुरुवात झालेली आहे.
अजित महाडिक,
निवडणूक विभाग अधिकारी.. भिवंडी महानगर पालिका
