आरटीओ मधील लिपिकाच्या कारभाराची चौकशी करणेचे मुख्यमंत्री सचिवालयाचे निर्देश

भिवंडी


भिवंडी ( प्रतिनिधी ) राज्य शासनाच्या परिवहन विभागा
अंतर्गत कार्यरत असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नवी मुंबई येथील लिपिक कर्मचारी भागवत देवकर यांची सखोल चौकशी करून त्यांचे विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सचिवालय कक्षा कडून नवी मुंबईच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांना दिले आहेत.त्यामुळे कार्यालय कर्मचाऱ्यांना मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राष्ट्रीय मानव हक्क मंचचे अध्यक्ष शरद धुमाळ यांनी याबाबत मुख्यमंत्री यांचेकडे तक्रार केली होती. त्यामुळे सदर निवेदनाची  दखल मुख्यमंत्री सचिवालय कक्षा कडून घेऊन हे आदेश पारित करण्यात आले आहेत.भागवत देवकर हे परिवहन विभागा अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात लिपिक म्हणून कायम सेवेत आहेत. शासनाच्या नियमानुसार काम न करता नियमबाह्य वर्तन करीतआहेत.कामासाठी आलेल्या नागरिकांशी सौजन्याने न वागता उद्धटपणे वागत आहेत. देवकर त्यांच्या कार्यालयीन उपस्थितीची नोंद शासन नियमाप्रमाणे बायोमेट्रिक पद्धतीने करीत नाहीत.ते कार्यालयात उशिरा येऊन लवकर निघून जातात.तसेच देवकर हे शासनाच्या झिरो पेडन्सी अँड डेली डिस्पोजल या शासन निर्णयानुसार कार्यालयीन कामकाज न करता मनमानी पद्धतीने कामकाज करीत आहेत.तसेच शासन निर्णय नुसार शासनाच्या सेवेत प्रवेश करताना त्यांच्या मालमत्तेची,मालमत्ता संपत्तीची व दायित्वाची माहिती शासनास सादर केलेली नाही. देवकर संबंधित शासन निर्णयाचा भंग करीत असल्याचे धुमाळ यांनी तक्रार निवेदनात नमूद केले आहे.त्यामुळे त्यांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री सचिवालय कक्षाने निर्गमित केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *